वैजापूरच्या बँकेतील प्रकार
वैजापूर शहरातील येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोढा मार्केट शाखेत नकली सोन्याच्या तारणावर कर्ज घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बँकेला तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन ग्राहकांसह बँकेच्या पॅनलवरील सोनाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश अनंतराव अधिकार, अनुराधा विलास रणखांबे, सरला गोविंद उचित अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नवनीत नारायण शर्मा (वय ४७) हे भारतीय स्टेट बॅंकेच्या वैजापूर शाखेत गेल्या एक वर्षापासून शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेत गोल्ड लोनच्या प्रक्रियेसाठी (सोनेतारण कर्ज )उपव्यवस्थापक दिपांजली जेधे आणि सर्व्हिस मॅनेजर राजीव लक्ष्मण सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. गोल्ड लोनसाठी तारण ठेवलेले सोने लॉकरमध्ये ठेवणे आणि कर्जमुक्तीनंतर ग्राहकांना सोने परत करणे यासारख्या जबाबदाऱ्या या दोघांकडे आहेत.
याशिवाय, छत्रपती संभाजीनगर येथील स्टेट बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाने कमलेश अनंतराव अधिकार याला गोल्ड लोनसाठी सोन्याची पडताळणी आणि प्रमाणपत्र देण्याचे काम सोपवले आहे. कमलेश गेल्या पाच वर्षांपासून या शाखेत सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करत आहेत. बँकेत गोल्ड लोन देण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे राबवली जाते. ग्राहकाने तारण ठेवलेल्या सोन्याची पडताळणी कमलेश अधिकार याच्याकडून केली जाते. त्यानंतर उपव्यवस्थापक दिपांजली जेधे यांच्या देखरेखीखाली कर्जाची फाइल तयार होते. शाखा व्यवस्थापक नवनीत शर्मा यांच्या अंतिम स्वाक्षरीनंतर कर्ज मंजूर केले जाते.
कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा झाल्यानंतर, सोन्याच्या मूल्यांकनासाठी सोनाराला ०.२% फी (किमान १०० रुपये आणि कमाल ६०० रुपये) दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते, असे बँकेकडून सांगण्यात आले. दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी उपव्यवस्थापक दिपांजली जेधे यांना बँकेच्या अंतर्गत परीक्षेसाठी रजा घ्यावी लागली. त्यांच्या अनुपस्थितीत प्रोबेशनरी अधिकारी आनंद कुमार यांच्याकडे गोल्ड लोनचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.
याच काळात गोकुळ सुखदेव सोनवणे (रा. सुदामवाडी, बोरसर, ता. वैजापूर) यांनी ९७.८० ग्रॅम सोन्याच्या तारणावर ५ लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला. आनंद कुमार यांनी ही फाइल शाखा व्यवस्थापक नवनीत शर्मा यांच्याकडे सादर केली. कमलेश अधिकार यांनी सोन्याची पडताळणी करून ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर, १३ जानेवारी २०२५ रोजी दिपांजली जेधे यांनी पुन्हा कामावर रुजू होत कार्यभार स्वीकारला.
यावेळी त्यांना गोकुळ सोनवणे यांच्या कर्ज मंजुरीची माहिती देण्यात आली. याचप्रमाणे, २९ जानेवारी २०२५ रोजी अनुराधा विलास रणखांबे (रा. जीवनगंगा सोसायटी, वैजापूर) यांनी ५९.३० ग्रॅम सोन्यावर २ लाख ९० हजार रुपये कर्जासाठी अर्ज केला. कमलेश अधिकार यांनी या सोन्याची पडताळणी करून प्रमाणपत्र दिल्याने हे कर्जही मंजूर झाले. पुढे, २५ एप्रिल २०२५ रोजी पवन रमेश शिंदे (रा. रोटेगाव, ता. वैजापूर) यांनी ७४.९० ग्रॅम सोन्यावर ४ लाख रुपये आणि ६ मे २०२५ रोजी सरला गोविंद उचित (रा. एम. जी. रोड, भाजीमंडई, वैजापूर) यांनी ८४.९० ग्रॅम सोन्यावर ४ लाख ७१ हजार रुपये आणि ८१.८० ग्रॅम सोन्यावर ४ लाख ५४ हजार रुपये कर्जासाठी अर्ज केला. या सर्व फायलींवर कमलेश अधिकार यांनी सोन्याची शुद्धता प्रमाणित केल्याने कर्ज मंजूर करण्यात आले.
मे २०२५ मध्ये उपव्यवस्थापक दिपांजली जेधे यांनी कमलेश अधिकार याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नसल्याने संशय निर्माण झाला. शाखा व्यवस्थापकांनी प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधला असता, बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश मिळाले. यासाठी प्रादेशिक कार्यालयाने दुसरे सोनार सुमित भगवानराव भागवत (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना नियुक्त केले. सुमित यांनी ५ जून २०२५ रोजी बँकेत ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली असता गोकुळ सुखदेव सोनवणे: ९७.८० ग्रॅम (५ लाख रुपये कर्ज), अनुराधा विलास रणखांबे: ५९.३० ग्रॅम (२ लाख ९० हजार रुपये कर्ज), पवन रमेश शिंदे: ७४.९० ग्रॅम (४ लाख रुपये कर्ज), सरला गोविंद उचित: ८४.९० ग्रॅम (४ लाख ७१ हजार रुपये) आणि ८१.८० ग्रॅम (४ लाख ५४ हजार रुपये) या ग्राहकांचे सोने नकली असल्याचे समोर आले. सुमित भागवत यांनी याबाबत लेखी प्रमाणपत्र दिले, ज्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला.
संगनमताने ठेवले नकली सोने
बँकेने संबंधित ग्राहकांना बोलावून त्यांचे सोने नकली असल्याचे कळवले आणि कर्जाची रक्कम तात्काळ परत करण्यास सांगितले. यापैकी गोकुळ सुखदेव सोनवणे यांनी ५ लाख रुपये आणि पवन रमेश शिंदे यांनी ४ लाख रुपये बँकेत जमा केले. मात्र, अनुराधा रणखांबे (२ लाख ९० हजार रुपये) आणि सरला गोविंद उचित (९ लाख २५ हजार रुपये) यांनी अद्याप कर्जाची परतफेड केलेली नाही. बँकेच्या तक्रारीनुसार, अनुराधा रणखांबे, सरला उचित आणि कमलेश अनंतराव अधिकार यांनी संगनमताने नकली सोने तारण ठेवून बँकेची १२ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. कमलेश यांनी नकली सोन्याला खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने ही फसवणूक शक्य झाली. बँकेने या तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin