Hot Posts

6/recent/ticker-posts

Digital Hordings | आता 'चमकोगिरी'ला बसणार चाप; या 'सात' ठिकाणीच करता येईल 'बॅनरबाजी'

वैजापूर नगरपालिकेत बैठक 

 वैजापूर शहरात अनधिकृत डिजिटल फलक (होर्डिंग्ज) लावणाऱ्याविरुद्ध पालिका प्रशासन आता कारवाईचा बडगा उगारणार आहे.  नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या पालिका व पोलिस प्रशासनाने घेतलेल्या  लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक शहरातील मोक्याची ठिकाणे पाहून बॅनरबाजी करून 'चमकोगिरी' करीत आहेत. 

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. परंतु त्याचे पालन होताना दिसले नाही. शहरात डिजिटल फलक लावण्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. परंतु सर्वांनीच नियम धाब्यावर बसवून 'चमकोगिरी' सुरूच ठेवली. साधारणतः दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने याबाबत नियमावली लागू केली होती. 

परंतु कुणीही ही नियमावली गांभीर्याने न घेता आपलेच घोडे दामटले. परंतु आता पालिका प्रशासनाने नियम लागू केले आहेत. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनीही नको त्याठिकाणी उभारण्यात येणारे अनधिकृत बॅनरमुळे अपघातांची संख्या वाढत आहे . त्यामुळे यापुढे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे सांगितले. याशिवाय या बैठकीत नागरिकांनी पालिका प्रशासनासमोर स्वच्छतेबाबत देखील काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. या सूचनांची नक्कीच दखल घेऊ. असे आश्वासन मुख्याधिकारी बिघोत यांनी दिले.

कुठं लावता येतील होर्डिंग्ज?

दरम्यान यावेळी मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी  सांगितले की, शहरातील पोलिस ठाणे कॉर्नर, म्हसोबा चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती समोर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व शनि मंदिर परिसर या सातच ठिकाणी बॅनर (होर्डिंग्ज) लावता येणार असून यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही ठिकाणी वगळता अन्य ठिकाणी होर्डिंग्ज लावता येणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.