शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर: तालुक्यातील शिऊर येथे एकाच्या अंगावर भंडारा टाकून मंत्र बोलणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओ चित्रफितीच्या आधारे एका भोंदू बाबाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातंर्गत शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय रंगनाथ पगार (रा.शिऊर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिऊर येथील एका मंदिरात बसून संजय पगार हे एका व्यक्तीच्या अंगावर भंडारा टाकून मंत्र बोलून व हातातील ढोलकी वाजून मंत्र म्हणून समोर बसलेल्या व्यक्तीला उभा करून नाकाला बूट लावला. तसेच मंदिरासमोर त्याला उताणे झोपून त्याचे मानेवर पाय ठेवून पोटावर काठी ठेवून 'सोड त्याला, सोड त्याला नाहीतर धोपटी घालीन' असे बोलतानाचे कृत्य करतानाचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने शिऊर पोलिसांसमोर सादर केला. या व्हिडिओच्या आधारे सरकारतर्फे पोलिस हवालदार किशोर आघाडे यांनी शिऊर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
Social Plugin