तिघेजण जखमी
वेरूळ (जि. छत्रपती संभाजीनगर): खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी (Verul Caves) बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला करून घायाळ केले. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास लेणी क्रमांक १६ मध्ये घडली. या घटनेमुळे लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान लेणी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र साहूजी यांनी काही पर्यटकांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले.
यावेळी दिल्लीहून आलेले पर्यटक रमेश सिंग यांनी सांगितले की, आम्ही तिघेजण वेरुळ लेणी बघण्यासाठी आलो होतो. मात्र येथे आल्यानंतर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने माझ्यासह मुंबईहून आलेले माझे मित्र प्रतीक सिंग व आदित्य यांनाही मधमाशांनी हल्ला करून जखमी केले आहे.
पुरातत्व विभाग उपाययोजना करणार का?
दरवर्षी उन्हाळ्यात मधमाशांद्वारे पर्यटकांवर हल्ले होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या असून भारतीय पुरातत्त्व विभाग याप्रकरणी काहीही उपाययोजना करीत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी लहान मुले, अबालवृद्ध तसेच विशेषतः महिला वर्गांमध्ये होणाऱ्या या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मधमाशांच्या हल्ल्यांमुळे आलेल्या पर्यटकांना पाय घसरून पडणे, पाय मोचकणे आदी स्वरूपाच्या त्रासाला सामोरे जाऊन गंभीर दुखापती होण्याच्या घटना घडतात. पडल्यामुळे ग़भीर जखमाही होतात. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाने खबरदारी म्हणून लेणी परिसरामध्ये मधमाशांचे मोहोळ बसू न देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Social Plugin