Hot Posts

6/recent/ticker-posts

Stock Market Scam | 'शेअर बाजारा'तून गंडविण्याचा अनोखा 'गोरखधंदा'; 'रक्कम गुंतवा अन् फसवणूक करून घ्या'!

  लुबाडणाऱ्यांची संख्या वाढली 


 गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांना लुबाडण्याचा अनोखा फंडा  काहींनी अवलंबिला आहे. विशेष म्हणजे गंडा घातल्यानंतर फसवणूक झालेल्या नागरिकांच्या हाती काहीच राहत नसल्याने त्यांची 'ना हक ना बोंब' अशी गत होऊन जाते.

हेही वाचा: 'तो' म्हणाला नवऱ्याला फारकत दे अन् माझ्याशी लग्न कर; 'तिच्या'वर चाकूहल्ला!

          दोन वर्षांपूर्वी एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या शेअर बाजारावर आधारित 'स्कॅम १९९२' चित्रपटाला मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग लाभला होता. या चित्रपटातील नायक शेअर बाजारात क्लृप्ती लढवून रातोरात करोडपती होतो. या चित्रपटाचा नागरिकांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या नायकाचे उदाहरण समोर ठेऊन अनेकांना शेअर बाजाराची भुरळ पडली. 

हेही वाचा: पंचगंगा: सव्वालाख टन ऊस गाळपाचा गाठला टप्पा!

नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत मागील काही दिवसांत वैजापूर शहरात नागरिकांची मोठी आर्थिक लुबाडणूक झाली. 'तरुणांनी आमच्या मध्यस्थीने शेअर बाजारात पैसे गुंतवा' अशी जाहिरात करून अनेकांना लाखाला दहा हजार रुपये प्रति महिना असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर माया गोळा केली. दरम्यान मोठया प्रमाणात पैसे जमा झाल्यावर त्याच नागरिकांच्या मुळ रकमेतून दोन-चार महिने परतावा म्हणून दरमहा १० टक्के इतकी रक्कम परत द्यायची व काही दिवसांत गाशा गुंडाळून शहरातून पळ काढायचा. या व्यवहारात शासनाचा दुरान्वये संबंध नाही. अशा व्यवहारात 'यश' येणे मुश्किल असते हे नागरिकांना सगळी लुबाडणूक झाल्यावर समजते.

हेही वाचा: 'फोडा आणि राज्य करा'; महामार्गावरील दुभाजकाची तोडफोड!

असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात लुबाडणूक झालेल्या नागरिकांनी वैजापूर पोलिस ठाण्यात धाव देखील घेतली. परंतु 'बड्या' बढाया मारत लोकांकडून पैसे गोळा करणाऱ्या 'त्या' इसमाने लोकांना चेक वाटप करून मोकळा झाला. नंतर येवला रस्त्यावर थाटलेले ऑफिस बंद करून गायब झाला. त्यानंतर लुबाडणूक झालेल्या नागरिकांनी 'त्या' इसमाच्या घरी चकरा मारल्या. परंतु त्याच्या घरी देखील 'टाळे' असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले तर काहींनी लोकांचे पैसे जमा करून शेअर बाजारात नुकसान झाले. असे म्हणून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला तर काहींनी शेअर मार्केट फंड्यात न 'यश' आल्याने सध्या भूमिगत राहणे पसंत केले आहे. या बहाद्दराने तर शहरातील अनेक तरुणांसह नामांकित व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याची चर्चा आहे. परंतु हातोहात पैसे दिल्याने नागरिकांच्या हाती देखील काहीच राहत नसल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहत नाही.

हेही वाचा: 'त्या' बहाद्दराने बनावट खाते केले अन् 'तिचे' आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल!

 परंतु असे असले तरी शेअर बाजाराच्या माध्यमातून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवणारे महाभाग कमी नाहीत. एखाद्याने गंडविले तर काही दिवसांतच या धंद्यात दुसरा कुणी येऊन 'बस्तान' बसवितो. पुन्हा काही दिवसांनंतर 'पहले पाढे पंचावन्न' होतात. परंतु ही साखळी थांबत नाही. पर्याय एकच की, कुणाच्या आमिषाला बळी न पडता आपला उद्योग सांभाळणे केव्हाही सोयीस्कर आहे. 'यशाला शाॅर्टकट अन् मेहनतीला पर्याय नसतो' हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.

२२ लाखांना गंडविल्याचे प्रकरण ताजेच!

शेअर बाजारातून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून एका सेवानिवृत्त ग्रेडरला २२ लाखाला गंडा घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात विनोद उत्तमराव पाटील(रा. तिरुपतीनगर रा. धुळे ह.मु. पुणे), सुनील गंगाधर पाटील, नवनीत हिरालाल पाटील (दोघे रा. नागलवाडी ता.चोपडा जि. जळगाव ह.मु.पुणे) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.