Hot Posts

6/recent/ticker-posts

Chemical fertilizers | खबरदार.! खंताचा काळाबाजार कराल तर.. अन्यथा होईल..; ४८ हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर

भरारी पथकाचा राहणार 'वॉच'


 वैजापूर: शेतकऱ्यांची खरीप हंगामात खते व बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून चढ्या भावाने विक्री हाेऊ नये यासाठी तालुका कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. तालुक्यासाठी ४८ हजार २३४ मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामात खतांची साठेबाजी करून काळा बाजार करणाऱ्या दुकानावर आता भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. तसेच दरपत्रक नसणाऱ्या दुकानांवर सुद्धा कडक कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे कृषी विक्रत्यांमध्ये भरारी पथकाची चांगलीच धड़की भरली असून गायब झालेले दरपत्रक पुन्हा दुकानात झळकू लागले आहे.


शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लागणारी रासायनिक खते शासनाच्या दराने खरेदी करावीत. तसेच खात्री करून संबंधित दुकानातून पक्की बिले घ्यावीत, असे आवाहनही कृषि विभागाने केले आहे. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण आहे. मृग नक्षत्र लागल्याने खत खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांसमोर गर्दी करीत आहेत. ही खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी दराबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. 

खते खरेदीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ती खरेदी करण्याचे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीप वाघमारे यांनी केले आहे. विशेष म्हणजे खत विक्रेत्यांनी नियमानुसार पॉस मशिनवरच खतविक्री करावी व कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी तपशीलवार खरेदीची पक्की पावती घ्यावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर थोडे बियाणे, बॅग, खरेदी पावती, कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. 

 किटकनाशक औषध फवारणी करताना काळजी घ्यावी. शेतकऱ्यांची काही तक्रारी असल्यास त्यांनी तालुका कृषी विभाग अथवा पंचायत समिती कृषी विभागाशी  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मंजूर खतांचे आवंटन असे

युरिया-१८००४ मेट्रिक टन

डीएपी-४००० मेट्रिक टन

एम.ओ.पी -५८२ मेट्रिक टन

सयुंक्त खते-१९२०० मेट्रिक टन

एस.एस.पी- ६४४८ मेट्रिक टन


खते, बियाणांची चढ्या दराने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. निविष्ठांबाबत काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

-जगदीप वाघमारे , कृषी अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर