शिऊरमध्ये ठोकल्या बेड्या
वैजापूर: घरगुती वादातून पतीने कोयत्याने सपासप वार करून ५५ वर्षीय पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथे घडली. घटनेनंतर पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बचावला. या घटनेचे ठोस कारण समोर आले नसून फरार झालेल्या मारेकरी पतीच्या पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळून गजाआड केले आहे. दरम्यान याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता चांगदेव शेलार ( ५५ रा. राहेगाव) असे ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे तर चांगदेव शेलार (५७) असे मारेकरी पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी चांगदेव शेलारसह पत्नी अनिता व सून असे तिघेजण घरात होते. तत्पूर्वी सून माहेरी गेलेली होती. तसेच चांगदेव शेलार हाही पंढरपूर येथे गेलेला होता. सासरा व सून एकाच दिवशी म्हणजे १४ जून रोजी घरी परतले.
![]() |
पती चांगदेव शेलार |
याच रात्री चांगदेव व अनिता शेलार या दोघांत कशावरून तरी वाद होऊन चांगदेवने कोयत्याने तिच्या मानेसह पायावर सपासप वार केले. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेनंतर चांगदेवने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी त्याला बाहेर काढल्याने तो बचावला. त्यानंतर त्याने धूम ठोकली. परंतु दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शिऊर येथे त्याच्या मुसक्या आवळल्या.
![]() |
मृत अनिता शेलार |
१५ जून रोजी सकाळपर्यंत या घटनेची माहिती कुणालाच नव्हती. घटनेची वाच्यता झाल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याशिवाय अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनीही घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर १५ जून रोजी अनिता यांचा मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता.
घटनेला अनैतिक संबंधांची किनार?
दरम्यान अनिता शेलार या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीला तीन वर्षे शिल्लक होते. चांगदेव हाही पोस्टमन आहे. अशा परिस्थितीत नेमके असे काय झाले असेल की, चांगदेव याने पत्नीचा खून केला? या दिशेनेही पोलिस यंत्रणा तपास करीत आहेत. याशिवाय या घटनेला अनैतिक संबंधांची किनार आहे का? या गोष्टीही तपासून बघितल्या जात असून पोलिसांनी तीही शक्यता वर्तवली आहे.
तक्रार देण्यास नकार!
विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घरातील सदस्य कुणीच पुढे यायला तयार नव्हते. कुणी तक्रार देत नसल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. शेवटी या प्रकरणात पोलिसांनाच फिर्यादी व्हावे लागले.
नेमके काय झाले? तिघांनाच ठाऊक!
रात्री जेव्हा ही घटना घडली तेव्हा चांगदेव, अनिता शेलार व सून असे तिघेच घरात होते. अनिता आता हयात नाही. चांगदेवलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या घटनेचे हे दोघे साक्षीदार आहे.
Social Plugin