Hot Posts

6/recent/ticker-posts

Encroachment removal campaign | वैजापुरातील अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर

 प्रमुख रस्त्यांसह उपरस्ते घेणार मोकळा श्वास

वैजापूर: छत्रपती संभाजीनगर शहरात ऐतिहासिक अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्याची धडक मोहीम सुरू असतानाच वैजापूर शहरातही ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपरस्ते (सर्व्हिस रोड) , नाल्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमणांबाबत महापालिकेने कडक पावले उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे तर आता वैजापूर शहरातही पसरलेली अतिक्रमणे काढण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी वैजापूर नगरपालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगररचना विभाग, पोलिस प्रशासनही तैनात केले जाणार आहे. 

गेल्या आठवड्यातच जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नगरपालिका कामांबाबत बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे प्रशासक बैठकीत उपस्थित होते. यावेळी जिल्हा दंडाधिकारी स्वामी यांनी महानगरपालिका स्तरावर होणाऱ्या विविध योजना आणि कामांचे निरीक्षण केले होते. त्यानंतर या बैठकीत अतिक्रमणांचा विषय उपस्थित झाला. आगामी दिवसांतच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत चर्चा झाली.या कुंभमेळ्यासाठी वेरूळ आणि घृष्णेश्वर मंदिरात अनेक पर्यटक येणार आहेत. त्यामुळे या परिसरासह सर्व नगरपालिकांमध्ये रस्त्याचे मोजमाप करून आणि सीमा निश्चित करून अतिक्रमण हटवण्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया नियमानुसार करावी. कायद्यानुसार सर्व अटींचे पालन करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर वैजापूर नगरपालिका आता 'ॲक्शन मोड'वर आली आहे. पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील बहुतांश प्रमुख रस्ते, उपरस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.  त्यामुळे शहरवासीयांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा 'श्रीगणेशा' कधी होणार? याबाबत तारीख निश्चित नसली तरी मात्र अतिक्रमणे जमीनदोस्त होणार. हे मात्र निश्चित!

'ही' अतिक्रमणे निशाण्यावर!

शहरातील मुख्यतः टिळकपथ, गांधी मैदान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, येवला रस्त्यावरील भाजीमंडई ही ठिकाणे अतिक्रमणांनी वेढली गेली आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोफेच्या तोंडी ही अतिक्रमणे असणार आहेत.

सीमारेषा करणार निश्चित 

वैजापूर शहरातील गंगापूरसह येवल, लाडगाव, डेपो आदी रस्त्यांवर मोजमाप करून सीमा निश्चित केल्या जातील. नाल्यांसह उपरस्त्यांवर थाटण्यात आलेली अतिक्रमणे काढून फेकली जाईल. या पार्श्वभूमीवर शहरात लवकरच ध्वनीक्षेपकद्वारे अतिक्रमणांबाबत घोषणा करून नागरिकांना सूचित करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचना देऊन नागरिकांना काही अवधी देण्यात येईल.

अनधिकृत बांधकामांवरही हातोडा 

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नगरपालिका शहरातील अनधिकृत बांधकामांवरही लक्ष ठेवून आहे. अनधिकृत बांधकामांचीही यातून सुटका होणार नाही. असेही पालिका सूत्रांनी सांगितले.